मुंबई : उद्या २ ऑक्टोबर, गांधी जयंती दिनी कॉकरोच जनता पार्टी आंदोलन करण्यावर ठाम आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सीजेपीचं आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तर दुसरीकडे या आंदोलनाला स्थानिक नागरिकांनीही विरोध केला आहे. तरीही दिपके याच ठिकाणी आंदोलन करण्यावर ठाम आहेत. उद्या जेलभरो आंदोलन करणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सीजेपीचं आंदोलन असेल.
कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादने दीपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीही दीपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. मात्र, ठाकरे गट केवळ पाठिंबा देऊन थांबलेला नाही तर आदित्य ठाकरे हे दीपके यांच्या मोर्चात खांद्याला खांदा लावून सहभागी होणार आहेत. त्यामुळे या मोर्चाकडे केवळ राज्याचेच नव्हे तर देशाचं लक्ष लागले आहे.
उद्या दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये सीजीपीचं आंदोलन होणार आहे. गांधी जयंती दिनी सीजेपीने आंदोलनाची हाक दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात प्रक्रियेवरून एल्गार पुकारण्यात आला आहे. आंदोलनाला स्थानिक नागरिकांकडून विरोध करण्यात येत आहे. यापूर्वी आंदोलक आणि सीजेपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली होती. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. सीजेपी संस्थापक अभिजीत दिपके यांनी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्येच आंदोलनाचा निर्धार बोलून दाखवला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. याठिकाणी पोलिसांनी बॅरिगेटिंग लावली आहे. सीजीपीच्या कार्यकर्त्यांकडून दोन वेळा मैदानाची पाहणी करण्यात आली आहे. मात्र पाहणी दौर्यादरम्यान दोनदा सीजेपी आणि स्थानिक नागरिकांमध्ये बाचाबाची झाली होती. मात्र आंदोलन शिवाजी पार्क मैदानामध्येच करण्याची भूमिका सीजीपीने जाहीर केली आहे.
कॉकरोच जनता पार्टीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलनाचा श्रीगणेशा मुंबईतून करण्याचे ठरवले आहे. मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये होणार्या आंदोलनासाठी देशभरातील तरुणांना येण्याचे आवाहन सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी केले आहे. ङ्गङ्घचला मुंबईला जाऊयाफफ अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केली आहे. हे आंदोलन गांधी जयंतीच्या दिवशी दुपारी ४ वाजता होणार आहे. या परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.